गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे आज (दि. ११) सकाळी दोन मोठे टस्कर हत्ती आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. हत्तींना पाहताच रस्त्याने जाणारी एक महिला घाबरुन खाली पडल्याने जखमी झाली.
सध्या गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज व कुरखेडा या तालुक्यांमध्ये रानटी हत्तींचे आवागमन सुरु आहे. पंधरा दिवसांपूर्वी गडचिरोलीनजीकच्या वाकडी परिसरात रानटी हत्तींनी उन्हाळी धानपिकाचे नुकसान केले होते. काल रात्री दोन टस्कर हत्ती चातगाव वनपरिक्षेत्रातील मरेगाव, गिलगाव परिसरात होते. त्यानंतर ते रांगीमार्गे गेले.
आज सकाळी ६ च्या सुमारास या हत्तींनी आरमोरी तालुक्यातील मानापूर गावात प्रवेश केला. यामुळे आबालवृद्धांची तारांबळ उडाली. गावाबाहेर गेलेली एक महिला हत्तींना पाहताच घाबरुन खाली पडल्याने तिला किरकोळ दुखापत झाली. मात्र, हत्तींनी कोणतेही नुकसान केले नाही. हत्ती गावात आल्याचे समजताच वनविभागाचे कर्मचारीही तेथे दाखल झाले. वनकर्मचारी आणि गावकऱ्यांनी हत्तींना हाकलून लावले. हे हत्ती सोनेरांगीच्या जंगलाच्या दिशेने निघून गेले. दोन्ही हत्ती शांत आहेत, ते कळपातून भरकटलेले असावेत, असे देलनवाडीचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेहर यांनी सांगितले.