गडचिरोली : टोळी वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील देलोडा गावानजीकच्या जंगलात घडली. मीरा आत्माराम कोवे (५५) रा.सुवर्णनगर, देलोडा, असे मृत महिलेचे नाव आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात मोहफुले वेचण्याचा हंगाम संपला. त्यानंतर मोहाच्या झाडांना टोळी लागल्या आहेत. या टोळींपासून नागरिक तेल तयार करतात. त्यामुळे अनेक जण टोळी वेचायला जातात. मीरा कोवे या सकाळी गावानजीकच्या जंगलात टोळी वेचण्यासाठी गेल्या होत्या.
टोळी वेचत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले. बराच वेळ होऊन मीराबाई घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता दुपारनंतर मीराबाईचा मृतदेह आढळून आला. पोर्ला वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला.
दहा वर्षांपूर्वी मीराबाईच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर चार वर्षांपूर्वी मोठ्या मुलाचाही दीर्घ आजाराने मृत्यू झाला. पुढे दोन वर्षांनी अविवाहित असलेल्या लहान मुलानेही आजारामुळेच प्राण सोडला. या गंभीर परिस्थितीत मीराबाई या सून व दोन लहान नातींसमवेत राहत होत्या. जेमतेम दीड एकर शेतीशिवाय मोलमजुरी व वनोपज वेचून त्या आपली सून व नातींचे पालनपोषण करीत होत्या. परंतु वाघाच्या हल्ल्यात त्यांना प्राण गमवावा लागल्याने सून व नाती पोरक्या झाल्या आहेत.