गडचिरोली,ता.१९: संपूर्ण महाराष्ट्रात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल राज्य म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख असली; तरी शनिवारी (दि.19) एका नक्षल दापंत्याने केलेल्या आत्मसमर्पणातून ही चळवळ देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या सीमेवर पोहचल्याचे उघड झाले आहे. असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत (३७) व अंजू सुळ्या जाळे उर्फ सोनिया उर्फ जनिता (२८) या नक्षल दापंत्याने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. असिन हा हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यातील मंडीकला येथील, तर अंजू जाळे ही गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील गुरेकसा येथील रहिवासी आहे.
असिन राजाराम कुमार याची शालेय जीवनात ‘बालदस्ता’ संघटनेत विशेष रुची होती. तो हरियाणातील जिंद येथे राहत असताना जागृत छात्र मोर्चात राज्य समिती सदस्य म्हणून त्याने उत्तर प्रादेशिक ब्युरोसाठी काम केले. २००६ मध्ये असिन हा छत्तीसगड राज्यातील नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबुझमाड एरिया प्रेस टीममध्ये भरती झाला. २०११ मध्ये प्रेस टीममधून कंपनी क्रमांक १० मध्ये त्याची बदली झाली आणि २०१३ पर्यंत तो तेथे एसीएम पदावर कार्यरत होता. त्याच वर्षी त्याची ओडिशातील प्रेस टीममध्ये बदली झाली. २०१३ मध्ये ओडिशातील उदंती व २०१४ मध्ये अन्य एका ठिकाणी झालेल्या चकमकीत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०१८ पर्यंत तो तेथे कार्यरत होता. त्यानंतर हिमाचल प्रदेशात राहून तो आपला उदरनिर्वाह करीत होता.
अंजू जाळे ही २००७ मध्ये नक्षल चळवळीत आली. गडचिरोली जिल्ह्यातील टिपागड दलमचा कमांडर दिनकर याची मदतनीस म्हणून काम करण्यास तिने सुरुवात केली. दुसऱ्याच वर्षी राही दलममध्ये तिची बदली झाली. २००९ पर्यंत ती तेथे कार्यरत होती. पुढे २०१० ते २०१२ या कालावधीत अबुझमाड भागातील घमंडी गावात जनताना सरकारच्या शाळेत शिक्षिका म्हणूनही तिने काम केले. २०१२ मध्ये तिची कंपनी क्रमांक १० मध्ये बदली झाली. तेथे २०१३ पर्यंत तिने सदस्य म्हणून काम केले. २०१३ ते २०१८ पर्यंत ओडिशा येथे प्रेस टीममध्ये हिंदी आणि गोंडी भाषेची टंकलेखक म्हणून तिने काम केले. २०१२ मध्ये लाहेरी व २०१३ मध्ये ओडिशातील उदंती येथील चकमकीत तिचा सहभाग होता. २०१६ मध्ये दोघांनी विवाह केला, असे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने असिनवर ६ लाख रुपयांचे, तर अंजूवर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. २०२२ पासून आतापर्यंत २९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
असिन आणि अंजू यांच्या आत्मसमर्पणातून नक्षल्यांच्या आंतरराज्यीय कनेक्शनची माहिती मिळणार आहे. असिन हा हरियाणा आणि ओडिशत सक्रिय होता. त्याची पत्नीदेखील सक्रिय होती. त्यांच्या एकूण कार्यप्रणालीवरुन नक्षल चळवळीचे जाळे देशाच्या विविध भागात कसे कार्यरत आहे, हे कळण्यास मदत होईल आणि आणखी काही म्होरके गवसतील, असे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.