Superintendent of Police Nilotpal transferred to Kolhapur
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या गृहविभागाने आज राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे कोल्हापूरला स्थानांतरण करण्यात आले असून, सध्याचे अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश यांची गडचिरोली जिल्हृयाचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये नीलोत्पल हे गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले. नीलोत्पल यांनी सर्वाधिक साडेतीन वर्षे या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात १७० हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. १२० हून अधिक नक्षल्यांना अटक करण्यात आली, तर १०० हून अधिक नक्षलवाद्यांना चकमकीत कंठस्नान घालण्यात आले.
१५ ऑक्टोबर २०२५ रोजी माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने ६० हून अधिक नक्षल्यांसह आणि त्याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का तसेच डीव्हीसी गिरीधर याने १ जानेवारी २०२५ रोजी केलेले आत्मसमर्पण, यंदा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी कंपनी क्रमांक १० चा कमांडर प्रभाकर यास चकमकीत कंठस्नान घालणं हे नीलोत्पल यांच्या कार्यकाळातील महत्वाचे यश होतं. यापूर्वी फिक्की संघटनेतर्फे नीलोत्पल यांना स्मार्ट पोलिसींग अवॉडनेही सन्मानित करण्यात आलं आहे.
एम.रमेश हे नोव्हेंबर २०२३ मध्ये गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले. जवळपास तीन वर्षे त्यांनी हा पदभार सांभाळला. काही महत्वाच्या चकमकींमध्ये श्री.रमेश हे स्वत: सहभागी होते. त्यांचा नक्षलग्रस्त जिल्ह्यातील अनुभव लक्षात घेता त्यांना पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.