गडचिरोली, : राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकीकडे गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनविण्याचे स्वप्न बघत असले; तरी याच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी, युवक व महिलांना अर्धवट पुलामुळे चक्क दोराच्या साह्याने पुरातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब आणि महाराष्ट्राचं औद्योगिक प्रवेशद्वार बनविण्याचं स्वप्न बघितलं आहे. परंतु याच जिल्ह्यातील दुर्गम,आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात रस्ते आणि पुलांची स्थिती भयावह आहे. छत्तीसगड सीमेवरील लाहेरी गावापलीकडे गुडेनूर हे गाव आहे. या गावाला जाताना मध्ये मोठा नाला आहे. मागील तीन-चार वर्षांपासून नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरु आहे. परंतु ते अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत गुंडेनूर व परिसरातील दहा-बारा गावांतील नागरिकांना पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने नद्या, नाल्यांना पूर आला आहे. गुंडेनूरचा नालाही ओसंडून वाहत आहे. दोन दिवसांपूर्वीच गुंडेनूरच्या नाल्यातून काही विद्यार्थी, युवक व महिला भर पुरातून प्रवास करीत असल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यात काही युवक दोराच्या साह्याने एकमेकांना आधार देत मोटारसायकल पुरातून काढत असून, विद्यार्थीही दप्तर घेऊन पुरातून नाला ओलांडत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांना आपल्या गावावरुन लाहेरीला शिक्षणासाठी जायचे असल्यास आधी नाला पार करावा लागतो आणि त्यानंतर ७ किलोमीटरची पायपीट करीत लाहेरी गाव गाठावे लागते.
एकूणच गुंडेनूर पलीकडच्या दहा-बारा गावांतील नागरिकांना शिक्षण, आरोग्य व दैनंदिन गरजांसाठी प्रचंड ससेहोलपट सहन करावी लागत आहे. यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पुरातून विद्यार्थी मार्ग काढत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला असून, मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्याचा विकास सुसाट वेगाने होत असल्याची बोचरी टीका केली आहे.