सहा जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली येथे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले.  (Pudhari File Photo)
गडचिरोली

Gadchiroli Naxal Surrender | सहा नक्षल्यांचे पोलिस महासंचालकांपुढे आत्मसमर्पण

सहा जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली येथे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यात प्रत्येकी तीन महिला व पुरुषांचा समावेश आहे.

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : सहा जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली येथे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यात प्रत्येकी तीन महिला व पुरुषांचा समावेश आहे. दोघे विभागीय समिती सदस्य, एक कमांडर, दोन पीपीसीएम, तर एक एसीएस असून या सर्वांवर एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षीस होते.

भीमन्ना ऊर्फ व्यंकटेश ऊर्फ सुखलाल मुतय्या कुळमेथे (वय ५८, डीव्हीसीएम, उत्तर बस्तर), त्याची पत्नी विमलक्का ऊर्फ शंकरक्का विस्तारय्या सडमेक (वय ५६, डीव्हीसीएम, माड डिव्हिजन), कविता ऊर्फ शांती मंगरू मज्जी (३४, कमांडर, वेस्ट ब्युरो टेलर टीम), नागेश ऊर्फ आयताल गुड्डी मडावी (३९, पीपीसीएम, कंपनी नं. १०), समीर आयतू पोटाम (२४, पीपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्निकल टीम) आणि नवता ऊर्फ रूपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी (२८, एसीएम, अहेरी दलम) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्याची नावे आहेत.

अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश अपर ,सत्य साई कार्तिक, गोकुल राज जी. उपकमांडंट सुमित वर्मा,सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे, उपअधीक्षक विशाल नागरगोजे उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांत गडचिरोली पोलिस व सीआरपीएफच्या संयुक्त कारवायांमुळे ७३ माओवादी कार्यकर्त्यांनी शस्त्रास्त्र टाकून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. यामध्ये केवळ २०२५ मध्येच आतापर्यंत ४० जणांनी आत्मसमर्पण केले आहे.

माओवाद्यांनी हत्या केलेल्या दोन नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत

यावेळी कवंडे, कोपर्शी-फुलनार आणि मोडस्के जंगल परिसरातील यशस्वी चकमकींमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी व जवानांचा पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माओवादी हिंसाचारात प्राण गमावलेल्या दोन निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.

पोलिस महासंचालकांनी साधला जवानांशी संवाद

महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शिल्लक राहिलेल्या माओवादी कार्यकर्त्यांना आत्मसमर्पण करून लोकशाहीच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. ३२ मार्चपूर्वी माओवाद संपवू असा निर्धार देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. गडचिरोली जिल्हा या मुदतीच्या आधी माओवादमुक्त करु, असे शुक्ला यांनी सांगितले. त्यांनी नवीन स्थापन झालेल्या संवेदनशील व अतिदुर्गम कवंडे पोलिस ठाण्याला भेट देत जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT