गडचिरोली : भारतीय जनता पक्षाने शनिवारी (दि.३१) २२ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.रमेश बारसागडे यांची गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आ.चैनसुख संचेती यांनी प्रा.बारसागडे यांच्या नावाची घोषणा केली.
भाजपने २० जुलै २०२३ रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे यांची भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अजून दीड महिना शिल्लक असताना पक्षाने नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. १३ मे रोजी पक्षाने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली होती. परंतु वादग्रस्त जिल्ह्यांमधील नियुक्त्या थांबविल्या होत्या. त्यात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश होता. अखेर आज त्यावर पडदा टाकण्यात आला.
गडचिरोली तालुक्यात होणारी वाळू तस्करी व अन्य बाबींसंदर्भातही पक्षातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी वाघरे यांच्याबाबत पक्ष नेतृत्वाकडे अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. अलीकडे नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने पक्षात चार गट निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र, बहुतांश जणांनी सुसंस्कृत व्यक्ती म्हणून प्रा.रमेश बारसागडे यांच्या बाजूने कौल दाखविल्याने प्रशांत वाघरे यांना कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पद सोडावे लागले.