Congress President Pankaj Guddewar Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Congress | गडचिरोली काँग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्षपदी पंकज गुड्डेवार

काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अॅड.गणेश पाटील यांनी गुड्डेवार यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले

पुढारी वृत्तसेवा

Congress District President Pankaj Guddewar

गडचिरोली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंकज गुड्डेवार यांची काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (दि.२४) दुपारी काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अॅड.गणेश पाटील यांनी गुड्डेवार यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले.

काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे हे त्यांच्या आश्रमशाळेत झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी सध्या कारागृहात आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेसने पंकज गुड्डेवार यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

पंकज गुड्डेवार हे विद्यार्थी दशेपासूनच काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. १९९८ मध्ये ते एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर २००१ ते २००६ पर्यंत त्यांनी एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. पुढे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, निवडणुकीद्वारे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, काँग्रेसचे जिल्हा सचिव अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिले.

विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक म्हणूनही काम केले आहे. २०२० पासून ते काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत असून, आता पक्षाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुड्डेवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे पक्षाची धुरा आल्याने पक्ष बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT