गडचिरोली : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दु:खद घटनेतून गडचिरोलीसह शेजारच्या जिल्ह्यातील ४३ पर्यटक बालंबाल बचावले. पहलगाममधील हल्ला झालेल्या ठिकाणाहून हे पर्यटक अर्धा तासापूर्वीच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील सहल आयोजित करणाऱ्या एका एजंटच्या माध्यमातून ४३ जण जम्मू काश्मीर आणि उत्तर-पश्चिम भागातील अन्य ठिकाणांच्या सहलीकरिता ११ एप्रिलला निघाले. त्यात मूल येथील ५ आणि ३८ जण गडचिरोलीतील होते. यात कुरखेडा आणि पोर्ला येथील मोजक्या पर्यटकांचाही समावेश होता. गडचिरोली येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार गणपत सोरते हेदेखील या पर्यटकांमध्ये होते. सोरते यांनी पहलगामच्या हल्ल्याचा वृत्तांत 'पुढारी'ला सांगितला.
सोरते यांनी सांगितले आम्ही मथुरा, आग्रा, कटरा, वैष्णोदेवी इत्यादी ठिकाणी भेट देत श्रीनगरला पोहोचलो. तेथून सोनमर्ग, गुलमर्गमार्गे मंगळवारी (ता.22) पहलगामला पोहोचलो. तेथे बैसरन नावाची घाटी आहे. ही घाटी ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखली जाते. आमच्यातील एकूण पर्यटकांपैकी आम्ही ४ जण घोड्यावर बसून दुपारी दीड वाजता बैसरन घाटीत पोहोचलो. उर्वरित पर्यटक खाली होते. अडीच वाजण्याच्या सुमारास आम्ही खाली आलो आणि तेथून सर्वजण चंदनवेलीला गेलो. तेथेच घाटीत आतंकवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे आम्हाला सांगण्यात आले. सुरक्षारक्षकांनी आम्हाला माघारी जाण्याची सूचना केली. तेथे गाडी बदलून आम्ही श्रीनगर आणि बुधवारी २३ एप्रिलच्या रात्री अडीच वाजता जम्मूला पोहचलो. पुन्हा तेथून लगेच पुढच्या प्रवासाला निघून आज सकाळी अमृतसर गाठले आणि आमचा जीव भांड्यात पडला, असे गणपत सोरते यांनी सांगितले.
भेदरलेल्या अवस्थेतील गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांना एका मुस्लीम गाडीचालकाने धीर दिला. आपण घाबरु नका. आम्ही तुम्हाला मदत करु. वेळप्रसंगी तुमची सर्व व्यवस्था करु, असे चालकासह अन्य काश्मिरी नागरिकांनीही या पर्यटकांना सांगितले. त्यामुळे या पर्यटकांच्या जीवात जीव आला.