Gadchiroli Paddy Scam Deulgaon 5 directors arrested
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रात उघडकीस आलेल्या ४ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी शनिवारी (दि.१०) आणखी ५ संचालकांना अटक केली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ७ वर पोहचली आहे.
पतीराम कोकोडे, पंढरी दादगाये, भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे व भिमराव शेंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पतिराम कोकोडे हे देऊळगावच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष, तर पंढरी दादगाये हे उपाध्यक्ष आहेत. उर्वरित तिघे संचालक आहेत. यापूर्वी १८ एप्रिलला प्रभारी विपणन अधिकारी चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर व विपणन निरीक्षक तथा ग्रेडर हितेश पेंदाम यांना पोलिसांनी अटक केली होती.
देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे पणन हंगाम २०२३-२४ व हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्यात आले होते. परंतु साठा पुस्तकानुसार व प्रत्यक्ष शिल्लक धान यात प्रथम दर्शनी तफावत आढळल्यामुळे नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार शिल्लक धानाची मोजणी करण्यात आली. त्यात २०२३-२४ च्या हंगामात ३९४४.०८ क्विंटल, तर २०२४-२५ च्या हंगामात ६१४० क्विंटल धानाची तपावत दिसून आली. शिवाय जुन्या बारदाण्याच्या संख्येतही तफावत आढळून आल्याने २ कोटी ४२ लाख ७२ हजार ८८५ रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आले. अशाप्रकारे दोन्ही हंगामात ३ कोटी ९६ लाख ६५ हजार ९६५ रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
त्यानंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक हिंमतराव सोनवाने यांच्या लेखी फिर्यादीवरुन कुरखेडा पोलिसांनी आदिवासी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, प्रभारी विपणन निरीक्षक चंद्रकांत कासारकर, हितेश पेंदाम, महेंद्र विस्तारी मेश्राम यांच्यासह आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (५), ३१८ (४),३ (५) अन्वये गुन्हे दाखल केले होते.
त्यापैकी चंद्रकांत कासारकर व हितेश पेंदाम यांना आधीच अटक करण्यात आली. काल आणखी पाच जणांना अटक करण्यात आली, असे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी 'पुढारी'ला सांगितले. आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक व देऊळगावच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र मेश्राम हे अद्याप फरार आहेत. पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ प्रकरणाचा तपास करीत आहेत.