Bhamragad Naxal activities
गडचिरोली : पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने रेकी करणाऱ्या नक्षल समर्थकास पोलिसांनी भामरागड परिसरातून अटक केली आहे. सैनू उर्फ सन्नू अमलू मट्टामी (वय ३८, रा.पोयारकोठी, ता.भामरागड) असे अटकेतील नक्षल समर्थकाचे नाव आहे.
२९ सप्टेंबरला भामरागड पोलिस ठाण्यातील पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या ३७ क्रमांकाचे जवान भामरागड परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. त्यांना एक संशयित व्यक्ती दिसताच त्यास ताब्यात घेतले. चौकशीअंती तो सैनू मट्टामी असून २७ ऑगस्टला कोपर्शी-फुलणार जंगलात झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. त्याअनुषंगाने सैनूवर कोठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने तो भामरागडमध्ये दाखल झाला होता. अनेक विध्वंसक कारवाया आणि गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते तपास करीत आहेत. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ११० नक्षल्यांना अटक केली आहे.
नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाचे कमांडंट दाओ अंजिरकान किंडो, अपर पोलिस अधीक्षक(अभियान) एम.रमेश,अपर पोलिस अधीक्षक (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.