गडचिरोली: भर दुपारी नागपुरातील बियर बारमध्ये बसून महत्वाच्या फायलींवर स्वाक्षरी करणारा व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्य शासनाने त्यास निलंबित केले आहे.
देवानंद सोनटक्के(५७) असे निलंबित उपविभागीय अभियंत्याचे नाव असून, तो चामोर्शी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनमध्ये कार्यरत आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास नागपुरातील मनिषनगर भागातील एका बियर बारमध्ये तीन व्यक्ती आले. सोबत फायलींचा मोठा गठ्ठाही होता. तिघांनीही दारुची मागणी केल्यानंतर एकेक फाईल खुली करण्यास सुरुवात झाली. दारुचे घोट रिचवता रिचवता फाईलवर स्वाक्षरी करणेही सुरु होते. यासंबंधीचा व्हीडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली.
शासनाचा कारभार आता बियर बारमधून होऊ लागल्याची प्रखर टीका झाल्याने चौकशीची चक्रे वेगाने फिरु लागली. व्हिडिओमध्ये चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चौकशीअंती राज्य शासनाने सोनटक्के यास निलंबित केले असून, त्याबाबतचा आदेश प्राप्त झाल्याची माहिती गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी सांगितले.
उपविभागीय अभियंता सोनटक्के याच्यासमवेत गडचिरोलीतील दोन मोठे कंत्राटदार होते. सोनटक्के यांना बारमध्ये बसून फायलींवर स्वाक्षरी करण्यास या दोघांनीच बाध्य केले असावे. त्यामुळे अशा व्यक्तींचे कंत्राट रद्द करण्यासंदर्भात वा त्यांची देयके रोखून ठेवण्यासंदर्भात शासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.