मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मुरलीधर महाराजांनी सुरु केली परिक्रमा Pudhari Photo
गडचिरोली

Gadchiroli News | ‘प्राण गेला तरी चालेल’ : मुरलीधर महाराजांचा निर्धार, मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुरु केली परिक्रमा

जीर्णोद्धाराचे काम रखडल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिक्रमा : दररोज ५१ किलोमिटर चालणार

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलने करुनही मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम रखडल्याने प्रशासन व पुरातत्व विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मुरलीधर महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह आजपासून मार्कंडेश्वर मंदिर आणि वैनगंगा नदीला परिक्रमा घालण्यास सुरुवात केली आहे. मुरलीधर महाराज दररोज ५१ किलोमीटर चालणार असून, १०८ परिक्रमा करणार आहेत.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे मार्कंडेश्वर मंदिर असून, ते अतिशय प्राचीन आहे. हे मंदिर बघितल्यानंतर खजुराहो लेण्‌यांची आठवण होते. दरवर्षी तेथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. विदर्भासह महाराष्ट्रातील विविध भागातून, तसेच शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातून लाखो भाविक येतात. शिवाय दररोज शेकडो भाविक पूजा-अर्चा करण्यासाठी येतात. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १० वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले.

परंतु प्रशासन व भारतीय पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे काम रेंगाळले आहे. यासंदर्भात मुरलीधर महाराज, मार्कंडेश्वर जीर्णोद्धार समिती, परिसरातील सरपंच व नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलनेही केली. परंतु कामाला गती मिळाली नाही. हे काम पुन्हा दहा वर्षे रेंगाळेल, अशी खात्री झाल्याने मुरलीधर महाराजांनी दररोज ५१ किलोमीटरची परिक्रमा करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात त्यांनी ८ जुलैला पोलिस, जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभाग आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन २१ जुलैपासून परिक्रमा करणार असल्याचे कळविले होते. परंतु कुणीही दखल घेतली नाही. अखेर मुरलीधर महाराजांनी आज गावकरी आणि भक्तांसह मंदिरात पूजाअर्चा करुन ढोलताशांच्या निनादात मार्कंडेश्वर मंदिर व वैनगंगा नदीला परिक्रमा घालण्यास सुरुवात केली. मार्कंडादेव, रामाळा, घारगाव, हरणघाट, कवठी, रुद्रापूर, उसेगाव, जिभगाव, शिर्सी, साखरी, लोंढोली, चिचडोह बॅरेज, चामोर्शी क्रॉसिंग इत्यादी गावांतून ही परिक्रमा होणार आहे. दररोज ५१ किलोमीटरची परिक्रमा होणा असून,१०८ परिक्रमा करण्यात येणार आहेत.

प्राण गेला तरी चालेल: मुरलीधर महाराज

सर्वांच्या श्रद्धेचे ठिकाण असलेल्या मार्कंडेश्वर मंदिराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझे प्राण गेले तरी चालेल, मात्र जीर्णोद्धार झाल्याशिवाय मी थांबणार नाही, असा निर्धार मुरलीधर महाराजांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT