राज्य शासनाकडून सहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या नक्षल महिलने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. ही नक्षल महिला जिल्ह्यातील खून, चकमकी आणि जाळपोळीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होती. जहाल नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी (वय.४०) असे तिचे नाव आहे. पोदाडी हिने गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केले. संगीता पोदाडी ही भामरागड तालुक्यातील तुर्रेमरका येथील रहिवासी आहे. ती नक्षल दलममध्ये संगीता, सोनी ,सरिता आणि कविता अशा विविध नावांनी ओळखली जात होती.
२००७ मध्ये ती छत्तीसगडमधील नक्षल्यांच्या माड डिव्हीजनमध्ये सहभागी झाली. त्यानंतर कोहकामेटा आणि महासमुंद दलममध्ये कार्यरत राहिली. २०१४ पासून ती एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ७, खुनाचे ३ आणि जाळपोळीचा एक गुन्हा दाखल आहे. राज्य शासनाने तिच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६७२, तर २०२२ पासून २४ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.