गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा
सुमारे ६ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या टिपागड दलमच्या एका जहाल नक्षल महिलेने आज (दि. २३) एका कार्यक्रमात पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. शशिकला उर्फ गुनी उर्फ झुरी उर्फ अंजू आसाराम आचला (वय ३०) असे या नक्षलीचे नाव आहे.
शशिकला आचला ही धानोरा तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत मोठा झेलिया या गावची रहिवासी आहे. डिसेंबर २००६ मध्ये ती टिपागड दलमची सदस्य झाली. सध्या ती टिपागड एलओएसमध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे १५, जाळपोळीचा एक व इतर ४ असे एकूण २० गुन्हे दाखल होते. शासनाने तिच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
आत्मसमर्पितांच्या वसाहतीत विविध योजनांचा शुभारंभ
गडचिरोली शहरानजीक नवेगाव येथे आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी नवजीवन वसाहत उभारण्यात आली आहे. आज पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते या वसाहतीत वसाहत बोर्डाचे अनावरण, वृक्षारोपण तसेच आत्मसमर्पण कल्याण कार्डाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शशिकला आतला या नक्षलीने आत्मसमर्पण केले.
नवजीवन वसाहतीत विद्युतीकरण, पेयजलाची सुविधा, तसेच पात्र उमेदवारांना नोकरीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शिवाय शिवणकाम, मोटार ड्रायव्हींग, गवंडी काम यांचे प्रशिक्षण देऊन आत्मसमर्पित नक्षल्यांना आत्मनिर्भर करणार असल्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक(अभियान)मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक(प्रशासन) समीर शेख, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे उपस्थित होते.