Isha Poreddiwar Pudhari
गडचिरोली

Gadchiroli District Bank | गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ईशा पोरेड्डीवार

उपाध्यक्षपदी खीरसागर नाकाडे, तर मानद सचिवपदी दीपक निंबेकर यांची बिनविरोध निवड

पुढारी वृत्तसेवा

GDCC Bank Chairman Election

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान ईशा प्रंचित पोरेड्डीवार यांना मिळाला आहे. उपाध्यक्षपदी खिरसागर नाकाडे, तर मानद सचिवपदी दीपक निंबेकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

ईशा पोरेड्डीवार या बँकेच्या माजी अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या पत्नी, तर सहकारमहर्षी अरविंद पोरेड्डीवार यांच्या स्नुषा आहेत. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव पदांची निवड करण्याकरिता संचालकांची सभा आज आयोजित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश चंदेल यांनी जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमानुसार, अध्यक्षपदासाठी ईशा प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्षपदासाठी खिरसागर नाकाडे व मानद सचिव पदासाठी दीपक निंबेकर यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला होता.

त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदी ईशा पोरेड्डीवार, उपाध्यक्षपदी खीरसागर नाकाडे व मानद सचिव म्हणून दीपक निंबेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश चंदेल यांनी जाहीर करुन त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

नव्या अध्यक्ष ईशा पोरेड्डीवार यांनी बीएससी, एमबीए (मानव संसाधन) व कंपनी सेक्रेटरी या अभ्यासक्रमात पदव्युतर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे कायदेशीर अनुपालन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कंपनीचे भागधारक, व्यवस्थापन, मानव संसाधन इत्यादी महत्वाचे विषय आणि बँकिंग व्यवसायात ईशा यांचा फायदा होणार आहे.

आजच्या निवडप्रसंगी सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, श्रीहरी भंडारी, अनंत साळवे, डॉ.दुर्वेश भोयर, अतुल नागुलवार, डॉ.बळवंत लाकडे, खेमनाथ डोंगरवार, बंडूजी ऐलावार, बँकेचे नवनियुक्त संचालक सौरभ म्हशाखेत्री, योगाजी फटाले, श्रीकांत नागीलवार, गजानन साळवे, गोकुळदास भट, सुनील तेलकुंटलवार, प्रणिता चिटकोशी, नेत्रा साळवे, महेंद्र मने, ईश्वर पासेवार, छाया पोरेड्डीवार, निलीमा पोरेड्डीवार, लक्ष्मीबाई खेडकर, नलीनी निकुरे, निलीमा मेश्राम, अमोल खेडकर, हिरालाल शेंडे उपस्थित होते. याप्रंसगी नवनिर्वाचित संचालक व माजी संचालकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सभेचे संचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले.

नव्या कायद्याच्या बडग्यानंतरही पोरेड्डीवारांनी अबाधित ठेवले वर्चस्व

राज्य सरकारने मंजूर केलेल्या बँकिंग कायदा(सुधारणा)-२०२५ अधिनियमान्वये ज्या संचालकांनी १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी संचालक म्हणून कार्यकाळ पूर्ण केला होता; अशा संचालकांना बँकेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे बँकेचे माजी अध्यक्ष तथा राज्य शिखर बँकेचे संचालक अरविंद पोरेड्डीवार, माजी अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार तसेच विद्यमान अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार या दिग्गज संचालकांसह पोरेड्डीवारांच्या विश्वासातील अन्य संचालकांना यंदा निवडणूक लढता आली नाही. अशाही परिस्थितीत अरविंद पोरेड्डीवार यांनी आपल्या दीर्घ अनुभवाच्या आधारावर योग्य नियोजन करुन २१ संचालकांना अविरोध निवडून आणत बँकेवर ४० वर्षांपासूनचे आपले वर्चस्व अबाधित ठेवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT