गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची होळी ही साधारण असते. ते अगदी छोटी होळी पेटवतात. दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण मात्र, उत्साहात इतर समाजाप्रमाणेच एकमेकांना रंग लावून साजरा केला जातो.
आदिवासी समाज निसर्गपूजक आहे. त्यामुळे ते लाकडांची मोठी होळी पेटवत नाहीत. इतर लोक होळी पेटवितात म्हणून काही हौशी मुले छोटी होळी पेटवतात. विशेष म्हणजे अन्य समाजाप्रमाणे होळीच्या दिवशी पुरणपोळी किंवा इतर गोडधोड पदार्थ बनविण्याची प्रथाही या भागातील आदिवासींमध्ये नाही. मात्र, रंगपंचमीच्या दिवशी आदिवासी बांधव गुलाल किंवा रासायनिक रंगांचा वापर करीत नाहीत. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात येणारी पळसाची फुले पाण्यात भिजवून त्याचा अर्क नैसर्गिक रंग म्हणून एकमेकांना लावला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत पळसाच्या फुलांचा अर्क शीतपेय म्हणून वापरल्याने अंगातील उष्णता कमी होते, असे आदिवासी समाजातील ज्येष्ठ नागरिक सांगतात.