

आदिवासी संस्कृतीमध्ये सर्वांत मोठा व लोकप्रिय सण मानल्या जाणाऱ्या होळी सणाला सातपुड्यात सुरुवात झाली आहे. आदिवासी समाज फार प्राचीन, सभ्य संस्कारांनी व विविध वैशिष्ट्यानी नटलेला आहे. आदिवासी समाजात अनेक रूढी परंपरा, रितीरिवाज, समज, संकल्पना, विश्वास व नितीनियम अस्तित्वात आहेत. अत्यंत निराळ्या पद्धतीने साजरा होणारा पारंपारिक आदिवासी होली उत्सव त्यापैकीच एक आहे. आदिवासींची होळी म्हणजे सध्या आपण सर्वत्र पाहतो तशी होळी आणि रंगपंचमी नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग नियमांनी जगणारा समाज या सणाच्या माध्यमातून एक मोठे परंपरा जपून आहे. त्यातही गावोगाव साजऱ्या केल्या जाणाऱ्या होलिकोत्सवापेक्षा मानाच्या राजवाडी होळीचे आगळे महत्त्व इथे सातपुडा रांगेत पाहायला मिळते. अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे साजऱ्या होणाऱ्या राजवाडी होळीचे सर्वत्र मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळतो.
सध्या त्याच राजवाडी होळीचे वेध सातपुडा पर्वताच्या कडीकपारीतल्या बांधवांना लागले असून सातपुड्यातील दऱ्या-खोऱ्यात ढोल आणि बासरीचा सूर घुमू लागला आहे. होलिकोत्सवाची पूर्वतयारी करणाऱ्या हजारो स्त्री-पुरुषांचे पाऊले एका तालात थिरकताना दिसून येत आहे. पंरपरागत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या काठी येथील राजावाडी होळीची तयारी सुरू झाली असून जवळपास 100 फुट उंचीचा होळीचा दांडा गुजरातच्या जंगलातून विधीवत पुजा करुन आणला आहे. काठीच्या होळीला पुजेसाठी प्रत्येक गावातील ग्रामस्थ हजेरी लावतात. निलीचारी, वागदेव, गांवशिवार, गवाणपुजन, गांवदिवाळी, कण (धान्य) पुजन, ओलीजोगण (होळी) इत्यादी सण-उत्सव निसर्गातील प्रतिक असून निसर्गातील वस्तू प्रत्यक्षात जीवनात उपयोगी आल्यात त्या-त्या वस्तूना देव मानून पुजन करत असतात. प्रारंभ होणार आहे. या उत्सवात आदिवासी बांधव रात्रभर होळीच्या दांड्याभोवती घेर धरून पारंपरिक नृत्य करतात. विविध पेहराव केलेले बावा, बुद्या, ढोल, मोरखी, धानका, डोको नावाने संबोधले जाणारे पात्र जंगल संस्कृतीचे दर्शन घडवतात. मोरपंखांचा टोप घातलेले, कमरेला बांधलेल्या सुक्या भोपळ्यांच्या आणि घुंगरांच्या माध्यमातून नाद निर्माण करीत विशिष्ट पद्धतीने थिरकणारी त्यांची पावले, बासुरीच्या सुरावटी सोबत निनादणारे ढोल हे सर्व मोठे विलोभनीय वाटते. आदिवासी दागदागिन्यांच्या, रंगीबेरंगी आकर्षक कपड्यांच्या पेहराव हे सुद्धा एक निराळे वैशिष्ट्य आहे. काठीच्या मानाच्या होळीचे पूजन करण्याचा मान दरवर्षी विशेष व्यक्तींना देण्यात येतो. यंदा काठी गांव पुजारा म्हणून गोमर्या टेंबर्या वसावे, रायसिंग हांद्या वसावे, सतिराम भामटा वसावे, होळी घेऊन येणारे सेवेकरी रायसिंग हांद्या वसावे, सेमट्या टेड्या वसावे, मांग देहल्या राऊत, बाहह्या किर्ता वसावे, नोवजा इरमा वसावे, रामा बाहद्या पाडवी, रविंद्र पेचरा वसावे हे आहेत. होळी सजावट करणारे बापा राऊत, जोतन्या वसावे, तेजला राऊत, दोहर्या वसावे, गोप्या वसावे, सांगा राऊत हे आहेत.
होळीच्या महिनाभर आधी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे दर्शन झाल्यानंतर कुर्र् अशी हाळी देवून ढोल, मांदलवर थाप मारून होळीचा दांडा रोवला जातो. त्या महिन्याला आदिवासी 'दांडाचा महिना' म्हणतात. पौर्णिमेच्या दिवशी दांडा गाडला जातो त्या दिवसापासून आदिवासी कुटुंबात लग्न, उत्तर कार्य, नवीन घर बांधणे, जीवंत झाड कापणे पुर्ण पणे बंद केले जाते. ती अलिखित आचारसंहिता समाजात सर्वांना पाळावी लागते. या कालावधीत कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर भगत, बोडवाकडे एक मुठभर धान्य घेऊन जातात. आदिवासी समाजात भगत, पुजारा, बोडवा, मोडवी (इतिहासकार) याना आजही मानाचे स्थान आहे. सातपुडा परिसरात होळी अगोदर याहा मोगी मातेचे पुजन होते तदनंतर अमावस्या येते व ज्यादिवशी चंद्र दिसतो त्या दिवसापासून होळीचा नवस म्हणजेच पालनी केली जाते.
होळी सण अगोदरचा येणारा आठवडे बाजार हाट म्हणजे 'भोंगऱ्या हाट' मध्य प्रदेशातील खेतिया, पानसेमल, बडवानी, झाबुआ, अलिराजपुर तर महाराष्ट्रातील धडगांव, तोरणमाळ, फलाई, म्हसावद गुजरात राज्यातील कवाठ, पावी जेतपूर, झाब, तेलवमाता तसेच राजस्थान परिसरातील काही क्षेत्रांत अनेक ठिकाणचे भोंगऱ्या हाट प्रसिद्ध आहेत.
आदिवासी होलिकोत्सव म्हटलं की त्यात भोंगर्या बाजाराचा देखील प्रमुख आकर्षक भाग असतो. भोंगऱ्या बाजार म्हणजे सांस्कृतिक मूल्यांचा संदेश देणारा आदिवासींचा पारंपरिक उत्सव ! हा सण नंदुरबार जिल्ह्यासह परिसरात दरवर्षी आदिवासी बांधव वैयक्तिक व सामूहिकपणे साजरा करतात. सातपुडा परिसरातील आदिवासींचा सर्वांत महत्वाचा सण म्हटला जातो. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान सह कोकण पुणे मुंबई भागात नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले सर्व आदिवासी बांधव आणि कलारसिक लोक आवर्जून हा उत्सव पाहण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यात गर्दी करत असतात. भोंगऱ्या हा लग्नासाठी मुलींची निवड करणे, पळवून नेण्यासाठी सुरू झाल्याचा गैरसमज निर्माण झाला आहे. उपवर झालेल्या मुला मुलींना आपल्यातील पारंपारिक कलागुण एकमेकांसमोर मनमोकळेपणाने सादर करण्याची संधी म्हणून त्याचे आयोजन केलेले असते असे या समाजातील जाणकार सांगतात. निसर्गातील नव चैतन्या बरोबरच आदिवासींच्या जीवनात उत्कटपणे उत्साहाने भारलेले नवचैतन्य होळीसोबत येत असते. गीत, पौराणिककथा, नृत्य, संगीत असे वेगवेगळ्या प्रकारेचे कलामय जीवन दर्शन भोंगऱ्या-होळीत पाहायला मिळते.
अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या मोरीराही पाडा येथे देवाची पहिली होळी रविवार, ९ मार्च रोजी रात्री ७ वाजेपासून विधिवत पूजन करून साजरी करण्यात आली तथापि मानाच्या म्हटल्या जाणाऱ्या होळ्या पुढे दोन आठवडे चालतील. यात सोमवार, १० मार्चला पहाटे ५ वाजेच्या सुमारास पूजन करण्यात येणार आहे. काठी येथे मानाची राजवाडी होळी सर्वात महत्त्वाची मानले जाते. १३ मार्चला ही राजवाडी होळी काठी येथे साजरी होणार आहे. त्या नंतर गदवाणी, सिसा, सुरवाणी, पाडामुंड, भगदरी, नवानागरमुठा, चिंचखेडी येथे तर १४ मार्चला. मोलगी, तलाई, खर्डी, सल्लीबार, ठाणा, वडफळ्या या गावात आणि १५ मार्चला असली, जामली, मोगरा, राजबर्डी, जमाना, रोषमाळ बु. येथे आणि १६ मार्च रोजी वरखेडी, धनाजे येथे तर १७ मार्चला भुगवाडा गावात होलीकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. धडगाव तालुक्यातील रोषमाळ बु. येथेही राजवाडी होळी १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ढोल, बाबा बुध्या व खुर्ची ढोल, होळी गीत गायन स्पर्धा पार पडणार आहे.