Highway Thriller: The Burning Car; Mother, Father, and Son Narrowly Escape
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा
देसाईगंज येथून गडचिरोलीकडे येत असलेली कार आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ अचानक पेटली. यावेळी कारमधील आई, वडील आणि मुलगा थोडक्यात बचावले. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मूळचे साकोली येथील रहिवासी असलेले अनिल डोंगरवार हे देसाईगंज येथे वास्तव्यास आहेत. आज गडचिरोली येथे त्यांच्या मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर होता. त्यासाठी ते पत्नी व मुलासह एम.एच. ३३-४४०३ इको स्पोर्ट या चारचाकी वाहनाने गडचिरोलीकडे येत होते. आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ पोहचताच कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागला.
ही बाब रस्त्याच्या कडेने जात असलेल्या दोन मुलांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ चालकास इशारा करुन कार थांबविण्याचा इशारा केला. दोन मुले काहीतरी सांगत असल्याचे बघून कारचालक अनिल डोंगरवार यांनी तत्काळ कार थांबवली. तोपर्यंत कारमधून जास्त धूर निघण्यास सुरुवात झाली. क्षणाचाही विलंब न लावता कार थांबवून डोंगरवार हे पत्नी आणि मुलासह कारमधून बाहेर पडले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, काही क्षणातच कारने पेट घेतला.
माहिती मिळताच अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कार जळाली होती. कार शॉर्ट सर्किटमुळे जळाली की अन्य काही कारण होते, हे अद्याप अस्पष्ट आहे. आरमोरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.