Gopichand Padalkar controversy statement
गडचिरोली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) नेते जयंत पाटील यांच्या वडिलांचा नामोल्लेख करून केलेल्या विधानावर राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पडळकरांचे वक्तव्य वैयक्तिक असून ही भाजपची संस्कृती नाही, अशा शब्दांत बावनकुळे यांनी पडळकरांना फटकारले.
सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्हा दौऱ्यावर आले असता बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.देवराव होळी उपस्थित होते.
म्हणाले की, राजकारणात विरोधकांवर वैचारिक टीका करणे गैर नाही. परंतु व्यक्तीगत किंवा आई-वडिलांचे नाव घेऊन आरोप करणे योग्य नाही. पडळकरांचं वक्तव्य चुकीचं असून, आपण स्वत: त्यांच्याशी बोलणार आहोत. अशी चूक टाळण्यासंदर्भात काळजी घेतली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
आ.गोपीचंद पडळकर यांनी अलीकडेच एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वडिलांचा नामोल्लेख केला होता. त्यानंतर विरोधकांनी पडळकरांवर टीका करत माफी मागण्याची मागणी केली होती. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. राज ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी एकत्र येत बैठका सुरु केल्या आहेत. यासंदर्भात बावनकुळे म्हणाले की, कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आलेच पाहिजे. परंतु राज आणि उद्धव राजकारणासाठी वेगळे झाले. आता त्यांचे पटायला लागले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती एकत्रित लढेल, कुठे जागावाटपाचा तिढा असेल तर तो आपसात चर्चा करुन मिटवू. कदाचित काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीही होतील. पण राज्यात ५१ टक्के मते घेऊन महायुती सर्वांत बलाढ्य ठरेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.