गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात लावलेल्या तारांना स्पर्श झाल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. २४) चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्यांतर्गत वसंतपूरच्या जंगलात घडली. दीपक दिलीप सरकार (वय २१) असे मृत, तर आकाश आशुतोष मिस्त्री (वय १७) असे जखमी युवकाचे नाव आहे.
वसंतपूर गावानजीकच्या जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी अज्ञातांनी तारा लावून त्यात वीज प्रवाह सोडला होता. दीपक सरकार व आकाश मिस्त्री हे रात्री जंगलात जात असताना त्यांचा तारांना स्पर्श झाला. यात दीपकचा जागीच मृत्यू झाला, तर आकाश गंभीर जखमी झाला. त्याला चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे.