Crime News Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Crime | वाघोली शिवारातील खुनाचा ४८ तासांत उलगडा; दोन विधीसंघर्षग्रस्त बालके ताब्यात

चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात अमली पदार्थ व मद्यसेवनानंतर झालेल्या वादातून हत्या

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Wagholi Death Case

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात रस्त्यालगत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.

८ सप्टेंबर रोजी चामोर्शी-मूल मार्गालगत वाघोली शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मृतकाची ओळख पटविणे आणि आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके तयार करण्यात आली. तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती तसेच शेजारील जिल्ह्यातील पोलिसांशी समन्वय साधून तपास करण्यात आला. त्यातून मृतकाची ओळख नंदकिशोर मोतीलाल मिश्रा ऊर्फ बंटी (३३), रा. मूल, जि. चंद्रपूर अशी पटली.

तपासात दोन अल्पवयीन बालकांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ७ सप्टेंबर रोजी तिघेही घटनास्थळी गेले होते. अंमली पदार्थ व मद्यसेवन केल्यानंतर झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही बालकांनी दगड व मोटारसायकलमधील टी-रॉडने नंदकिशोर यांच्या डोक्यावर वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दोन्ही बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुमेध बन्सोडे करीत आहेत. अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात चामोर्शी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT