Vijay Wadettiwar Slams BJP
गडचिरोली : बारा वर्षांपासून भाजपची सत्ता असूनही गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे बारा वाजले आहेत. मोठमोठी कंत्राटं मॅनेज करीत सत्ताधारी टक्केवारीच्या राजकारणात व्यस्त असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी (दि.२८) पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला कोठी-कोरनार पूल अवघ्या तीन वर्षांत वाहून गेल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी पायाभूत सुविधाविषयक कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप केला. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी आणि प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. पालकमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी एक दिवस गडचिरोलीत येऊन येथील आरोग्य व्यवस्था सुधारावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.
अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करीत वडेट्टीवार यांनी जपतलाई गावापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नसणे आणि जवळच्या आरोग्य केंद्रात औषध उपलब्ध नसणे या बाबी गंभीर आहेत. अनुदानित आणि सरकारी आश्रमशाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत मोठी तफावत आहे. दोन्ही प्रकारच्या शाळांना समान अनुदान द्यावे अशी मागणी करीत वडेटटीवार यांनी शिक्षण व आरोग्य व्यवस्थेसाठी २५ हजार कोटी रुपये खर्च केले तर व्यवस्थेत बदल होऊ शकतो, असे प्रतिपादन केले.
कोईंदूळच्या गर्भवतीसंदर्भात घणाघात
एटापल्ली तालुक्यातील कोईंदूळ येथील गर्भवती महिलेला नाल्याच्या पुरातून खाटेवर न्यावे लागल्याचे वृत्त 'वेब पुढारी'ने आज प्रकाशित केले. त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, रक्षाबंधन हा पवित्र सण आहे. बहीण आपल्या भावाला राखी बांधून आपले प्रेम व्यक्त करते आणि भाऊ तिच्या सुरक्षेची हमी देतो. परंतु याच दिवशी एका गर्भवती भगिनीला नाल्यातून जीव मुठीत घेऊन जावं लागत असेल आणि सत्ताधारी मंडळी स्वत:ला भाऊ म्हणवून घेत असतील,
आपण बहिणींना काय दिलं याचा विचारा करावा, असे वडेट्टीवार म्हणाले. सत्ताधाऱ्यांना भगिनींच्या सुरक्षिततेशी चिंता आणि तिच्या वेदनेची जाणीव आहे काय, असे प्रश्न उपस्थित करुन वडेट्टीवार यांनी कोणत्याही गर्भवतीला पुरातून प्रवास करावा लागू नये, एवढी संवेदनशीलता जपावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पत्रकार परिषदेला आ.रामदास मसराम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, नगरसेवक सतीश विधाते, माधवराव गावड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.