दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, शिरपूर शेतशिवारातील घटना  Pudhari File Photo
गडचिरोली

Gadchiroli Drown News | दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, शिरपूर शेतशिवारातील घटना

दोघे नात्‍याने मावसभाऊ : आंघोळीसाठी गेल्‍यावर दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : शेततळ्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे घडली. विहान ज्ञानेश्वर मडावी(१२) रा.शिरपूर व रुदय ज्ञानेश्वर मडावी(९),रा.कुरखेडा,ता.गडचिरोली अशी मृत मुलांची नावे आहेत. दोघेही मावस भाऊ होते.

विहानचे वडील कुरखेडा तालुक्यात शिक्षक, तर रुदयचे वडील गडचिरोली पोलिस दलात कार्यरत आहेत. विहान हा कुरखेडा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकत होता. त्याचा मावसभाऊ रुदय हा गडचिरोली येथून मावशीकडे पाहुणा म्हणून आला होता. आज सकाळी विहान व रुदय हे सायकलने गावानजीकच्या नाजुक मडावी यांच्या शेतावर गेले होते.

तेथे शेततळा दिसल्याने दोघांनाही आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी शेततळ्याच्या पाळीवर सायकल ठेवली. त्यानंतर कपडे व पादत्राणे काढून दोघेही शेततळ्यात उतरले. परंतु पाणी खोल असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

काही वेळानंतर शेततळ्याजवळून जाणाऱ्या नागरिकांना पाळीवर सायकल, कपडे आणि पादत्राणे दिसली. मात्र, तेथे कुणीही दिसून आले नाही. त्यांनी निरखून बघितले असता दोघांचेही मृतदेह पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना आढळले. कुरखेडा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT