Sironcha taluka foreign liquor seized
गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असतानाही विक्रीसाठी अवैधरित्या दारुसाठा करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १४ लाख ४७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संदीप देवाजी दुर्गम (रा.जाफराबाद, ता.सिरोंचा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.२७) करण्यात आली.
जाफराबाद येथील संदीप दुर्गम याने घरी मोठ्या प्रमाणावर विदेशी दारु साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (दि.२७) धाड टाकून पंचांसमक्ष घराची झडती घेतली. आरोपी संदीप दुर्गे पळून गेला. मात्र, यावेळी घरात ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारुच्या ९० मिलिलीटर मापाच्या ११ हजार १३६ बाटल्या आढळून आल्या. बाजारात या दारुची किंमत १४ लाख ४७ हजार ६८० रुपये एवढी आहे. पोलिसांनी ही दारु जप्त करुन आरोपीविरुद्ध बामणी उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, उपनिरीक्षक विकास चव्हाण, हवालदार प्रेमानंद नंदेश्वर, निशिकांत अलोणे, गणेश वाकडोपवार यांनी ही कारवाई केली. बामणी उपपोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शाहू दंडे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.