Cyber Crime  ( File Photo)
गडचिरोली

Gadchiroli Cyber Crime | शेअर मार्केटच्या नावाखाली दोघांची ६५ लाखांची फसवणूक

गडचिरोलीनजीकच्या माडेतुकुम येथील कर सल्लागाराला सायबर भामट्यांनी मेसेज करुन 'टोटॅम-इन' ॲपच्या जाळ्यात ओढले

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Share Market Fraud

गडचिरोली : समाजमाध्यमाद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून गडचिरोलीतील दोन जणांची तब्बल ६५ लाखांनी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गडचिरोलीनजीकच्या माडेतुकुम येथील कर सल्लागार रूपेश पुंडलिक भुरसे (४१) यांना सायबर भामट्यांनी मेसेज करुन 'टोटॅम-इन' ॲपच्या जाळ्यात ओढले. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी एका अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे मोहन पाटील नामक इसमाने त्यांना गुंतवणुकीद्वारे मोठा परतावा मिळणार असल्याचे आमिष दाखवले. भुरसे त्या आमिषाला बळी पडले. त्यांनी गुंतवणूक करताच सुरुवातीला त्यांना नफा मिळाला.

त्यामुळे भुरसे यांना विश्वास वाटू लागला. पुढे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्याकडून कस्तुरी स्टील कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली २१ लाख रुपये मागण्यात आले. परंतु एवढी मोठी रक्कम भरुनही काहीच लाभ मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी गडचिरोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आणखी परिचित व्यावसायिक दत्तू कळमकर यांनाही असेच फसविण्यात आले. कळमकर यांच्याशी बंगळुरू येथील अनया अग्रवाल या महिलेने टेलिग्राम ॲपद्वारे संपर्क साधला. मार्च २०२६ पासून त्यांचा संवाद सुरु झाला. यातून तिने कळमकर यांना अल्ट्रापेक्स प्रो ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. ४ मार्च ते ७ मे २०२६ या दरम्यान कळमकर यांनी टप्प्याटप्प्याने ४४ लाख रुपये हस्तांतरीत केले.

ॲपमध्ये ६० लाखांचा नफा दिसत होता. परंतु जेव्हा प्रत्यक्षात रक्कम काढण्याचा प्रयत्न केला; तेव्हा अकाउंट ब्लॉक करण्यात आले. एवढेच नाही, तर २० टक्के दंड भरल्यास पैसे मिळतील, असे सांगून पुन्हा फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. हेही प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले. पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दोन्ही प्रकरणांचा तपास सुरु आहे.

सतर्क राहा: पोलिसांचे आवाहन

अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करणे प्रचंड जोखमीचे आहे. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित ॲप किंवा कंपनीची अधिकृतता पडताळून पाहावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT