Gadchiroli News : एटापल्ली तालुक्यात आढळली कथित नक्षलपत्रके : खाण प्रकल्पांना विरोध

gadchiroli news
Published on
Updated on

गडचिरोली : एकीकडे जिल्ह्यातील सशस्त्र नक्षलवाद संपुष्टात आल्याचा दावा पोलिस विभागाने केला असला; तरी नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या एटापल्ली तालुक्यात बऱ्याच कालावधीनंतर नक्षल पत्रक आणि बॅनर आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी उपपोलिस ठाण्यांतर्गत कुंडम गावाजवळ आज दोन ठिकाणी नक्षल पत्रके आणि बॅनर आढळून आले. या पत्रकात ओमसाई मिनरल, सनफ्लॉवर, जिंदाल स्टील लिमिटेड इत्यादी कंपन्यांचा उल्लेख करुन त्यांना विरोध दर्शविण्यात आला आहे. शिवाय हेटळकसा, कांदोळी, मोहुर्ली परिसरात सुरु असलेल्या ड्रोन सर्वेक्षणावरही आक्षेप घेण्यात आला आहे.

कंपन्यांना सहकार्य करणाऱ्या इशारा

एटापल्ली तालुक्यात सुरु असलेल्या आणि प्रस्तावित लोहखाण कंपन्यांना काही सरपंच, गाव पाटील, पोलिस पाटील आणि नागरिक सहकार्य करीत आहेत. त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. लोहप्रकल्पांमुळे आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीवरील हक्क आणि अधिकारांवर गदा आल्याने आदिवासींनी खाण प्रकल्पांविरोधात आंदोलन उभारावे, असे आवाहनही पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

पत्रकातील भाषेत विसंगती

माओवाद्यांचे आजवरची पत्रके बघता आज आढळलेल्या पत्रकातील भाषेत मोठी विसंगती दिसून येत आहे. एटापल्ली तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मागील एक-दोन वर्षांपासून कार्यरत आहे. हा पक्ष हिंसेवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे मार्क्सवाद्यांना बदनाम करण्यासाठी आणि पुन्हा नव्या लोहकंपन्या या परिसरात यायला नको, अशी इच्छा असलेल्या लोकांनी हे पत्रक आणि बॅनर लावले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान यासंदर्भात पोलिसांनी कान टवकारले असून, ते सखोल चौकशी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news