Gadchiroli rain update
जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुराची पाहणी केली Pudhari News Network
गडचिरोली

गडचिरोलीत पावसाचा जोर कमी, मात्र २० मार्गांवरील वाहतूक अजूनही बंद

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, विविध धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्याने अनेक नदी, नाल्यांचा पूर कायम असून गडचिरोली-आरमोरी, आलापल्ली-ताडगाव, भामरागड-एटापल्ली, आलापल्ली-सिरोंचा, आष्टी-आलापल्ली या प्रमुख मार्गांसह २० मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्पच आहे.

जिल्हाधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार कृष्णा रेड्डी यांनी आज हेलिकॉप्टरने सिरोंचा तालुक्याचा दौरा करुन गोदावरी आणि प्राणहिता नदीला आलेल्या पुराची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी दैने यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. पूर ओसरल्यानंतर साथरोग पसरु नये, याची काळजी घेणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे, गरजेनुसार पूरगस्त नागरिकांना निवारागृहात हलविणे इत्यादी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दैने यांनी दिले.

गोसेखुर्द धरणातून होणारा विसर्ग पुन्हा १० हजार क्यूमेक्सपर्यंत वाढविण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मागील चोवीस तासांत कोरची तालुक्यात सर्वाधिक १०२.८ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात ५४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

SCROLL FOR NEXT