पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प (Pudhari Photo)
गडचिरोली

Gadchiroli Rain | पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी; भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला, ४ मार्गांवरील वाहतूक ठप्प, शाळांना सुट्टी जाहीर

रेड अॅलर्ट जारी केल्याने दक्षिणेकडील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Bhamragad taluka disconnected

गडचिरोली : जिल्ह्यात गुरूवारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आज (दि.२५) सकाळपासून भामरागड तालुक्यातील ५० हून अधिक गावांचा बाह्यजगताशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद असून, जिल्ह्यातील चार मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने अतिवृष्टीचा रेड अॅलर्ट जारी केल्याने दक्षिणेकडील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ९९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल एटापल्ली तालुक्यात ६८.४ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील नऊ विभागांमध्ये अतिवृष्टी झाली असून, ताडगाव परिसरात १२० मिलिमीटर पाऊस पडला आहे.

पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद आहे. यामुळे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय सिरोंचा-असरअली, ताडगाव-दामरंचा व अहेरी-वट्रा हे मार्गही बंद आहेत.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ३०२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाने रेड अॅलर्ट जारी केल्याने प्रशासनाने चामोर्शी, अहेरी, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा इत्यादी तालुक्यांतील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT