School Principal Drowned Floods
गडचिरोली: जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नद्या-नाल्यांचा पूर कायम असून, भामरागड तालुक्यात एका मुख्याध्यापकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. वसंत सोमा तलांडे (वय ४२, रा.जोनावाही, ता.भामरागड) असे मृताचे नाव आहे. ते अहेरी तालुक्यातील पल्ले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. दरम्यान, अजूनही ११ मार्गांवरील वाहतूक ठप्पच आहे.
वसंत तलांडे मुख्याध्यापक असलेले पल्ले हे गाव अहेरी तालुक्यातील पेरमिलीवरुन १० किलोमीटर अंतरावर आहे. वसंत तलांडे यांनी पत्नीला फोन करुन पेरमिलीवरुन गावाकडे येण्यास निघालो, अशी माहिती दिली. परंतु ते गावी पोहोचलेच नाही.
मंगळवारी (ता.१९) भामरागड तालुक्यातील सिपनपल्ली नाल्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती तेथील कोतवाल दिनेश मडावी यांनी प्रशासनाला दिली. त्यानंतर मन्नेराजाराम महसूल मंडळातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली असता जोनावाही येथील वसंत तलांडे हे बेपत्ता असल्याचे कळले. नातेवाईकांनी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली. तलांडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे जोनावाही व पल्ले गावावर शोककळा पसरली आहे.
मागील दोन दिवसांत भामरागड तालुक्यात पुरात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता.१८) भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील लालचंद कपिलसाय लकडा (वय १९) हा तरुण खंडी नाला ओलांडताना पुरात वाहून गेला. त्यानंतर वसंत तलांडे यांचा मृत्यू झाला.
मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ७५ मिलिमीटर पाऊस पडला. त्या खालोखाल कुरखेडा तालुक्यात ४९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद आहे. शिवाय सिरोंचा-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग, अहेरी-वट्रृा, चौडमपल्ली-चपराळा, शंकरपूर-विठ्ठलगाव, कोकडी-तुळशी, कोंढाळा-कुरुड, भेंडाळा-गणपूर, हलवेर-कोठी व कोपेला-झिंगानूर या ११ मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्पच आहे.
दरम्यान, भामरागडमधील पूर ओसरत आहे. मात्र, तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी फुगली आहे. यामुळे सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका वाढला असून, तेथे बचाव पथक तैनात ठेवण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी नीलेश तेलतुंबडे यांनी सांगितले.