पुरामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू न शकल्याने ग्रामस्थांनी गरोदर महिलेला कावडीतून पुराचे पाणी पार करून नदीपलीकडे नेले  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Flood | रक्षाबंधनाच्या दिवशी गरोदर मातेची फरफट; पूल नसल्याने पुरातून कावडीतून जीवघेणा प्रवास

कोईंदुळ गावातील संतापजनक वास्तव; रुग्णवाहिकाही पोहोचेना, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा ग्रामस्थांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Koindul Village Pregnant Woman

गडचिरोली : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प केला जात असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोईंदुळ गावातील एका गरोदर मातेला मात्र रुग्णालय गाठण्यासाठी अक्षरशः जीवघेणा संघर्ष करावा लागला. नाल्यांवर पूल नसल्याने आणि पुरामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू न शकल्याने ग्रामस्थांनी या गरोदर महिलेला कावडीतून पुराचे पाणी पार करून नदीपलीकडे नेले.

कोईंदुळ हे एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गाव असून, गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. दोन नाले पार करुन जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळी छाया सुरेश नैताम(२६) गरोदर महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, नाल्यांना पूर आल्याने रुग्णवाहिकेला गावात पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत गरोदर महिलेला खाटेवर झोपवून कावडीच्या साहाय्याने पुरातून दोन्ही नाले पार केले. त्यानंतर पलीकडे आलेल्या रुग्णवाहिकेतून तिला रुग्णालयात नेण्यात आले. आरोग्यसेविकाही सोबत होत्या.

पावसाळ्यात दरवर्षी अशाच प्रकारच्या अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी २० जुलैला पुष्पा परसा या गरोदर महिलेला आणि इतर वेळी अन्य रुग्णांनाही नाले पार करून उपचारासाठी नेण्याची वेळ आली होती. वारंवार मागणी करूनही पूल आणि पक्क्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

“स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही मूलभूत वाहतूक सुविधेअभावी गरोदर मातेला पुरातून नेण्याची वेळ येणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन पूल व रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवावा,” अशी मागणी राजेश नरोटे आणि कोईंदुळ येथील ग्रामस्थांनी केली आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी समोर आलेले हे दृश्य दुर्गम भागातील आरोग्यसेवा आणि मूलभूत सुविधांच्या वास्तवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT