Bus Service on Markanar Aheri
गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाने पुढाकार घेत अहेरी आगारातून मरकनार गावासाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच बससेवा सुरु केली आहे. यामुळे अतिदुर्गम परिसर मरकनार व अन्य गावांतील नागरिकांची तालुका मुख्यालयी येण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. बससेवा सुरु होताच नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकावत जल्लोषात बसचे स्वागत केले.
भामरागड तालुका अतिदुर्गम असल्याने या भागात दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नाहीत. शिवाय अनेक वर्षे या तालुक्यात नक्षल कारवाया होत राहिल्याने नक्षल्यांनीही रस्ते आणि पुलांच्या बांधकामाला विरोध केला. त्यामुळे पायपीट करीत मुख्यालय गाठण्याशिवाय तेथील आदिवासींकडे पर्याय नव्हता. मरकनार, फुलणार, कोपर्शी, पोयारकोठी, मुरुमभुशी, गुंडूरवाही इत्यादी गावांमधील नागरिक मागील कित्येक वर्षांपासून हा त्रास सहन करीत होते. त्याअनुषंगाने पोलिस अधिकाऱ्यांनी परिवहन महामंडळाशी संपर्क साधून अहेरी आगारातून मरकनारपर्यंत बससेवा सुरु करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला परिवहन महामंडळाने प्रतिसाद दिला आणि आजपासून बससेवेचा शुभारंभ झाला.
अबुझमाडच्या पायथ्याशी असलेल्या मरकनार गावात आज प्रथमच बस येताच नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकावून स्वागत केले. गाव पाटील झुरु मालू मट्टामी यांनी बससेवेचा शुभारंभ केला. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या ३७ क्रमांकाच्या बटालियनचे सहायक कमांडंट अविनाश चौधरी, कोठी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप गवळी यांनी हिरवी झेंडी दाखवून बस मार्गस्थ केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, गोकुळ राज, उपअधीक्षक विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही बससेवा सुरु करण्यात आली.
९ फेब्रुवारी २०२५ रोजी मरकनारच्या गावकऱ्यांनी नक्षल गावबंदी ठराव पारीत करुन नक्षल्यांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला. मागील वर्षी कोठी-मरकनार रस्ता तयार करण्यात आला. शिवाय मरकनार ते मुरुमभुशी रस्त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. गावात एअरटेलच्या टॉवर बांधण्यात आले आहे. आता बस सुरु झाल्याने सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही लाभ होणार आहे.
पोलिसांच्या पुढाकाराने यंदा अतिदुर्गम भागात सुरु झालेली ही तिसरी बससेवा आहे. १ जानेवारीला एटापल्ली तालुक्यातील गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी ही बससेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर २७ एप्रिलला गडचिरोली-कटेझरी ही बसफेरी सुरु करण्यात आली. मागील पाच वर्षांत ४२०.९५ किलोमीटर लांबीच्या २० रस्त्यांबरोबरच एकूण ६० पुलांचे बांधकाम पोलिस संरक्षणात करण्यात आले आहे.