Gadchiroli Police Buried Explosives Recovered
गडचिरोली : माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केले. गर्देवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात १७ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष शोधमोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाच्या गडचिरोली व प्राणहिता येथील पाच तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) दोन पथकांना शोधमोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते. जंगल परिसरात कसून शोध घेतला असता जमिनीत लपवून ठेवलेले शस्त्र व स्फोटक साहित्य आढळून आले.
या कारवाईत एक १२ बोर रायफल, एक एअरगन रायफल, .३०३ चे १३ आणि ८ एमएमचे १८, असे एकूण ३१ जिवंत काडतुसे, तीन ग्रेनेड, १८ बीजीएल सेल, दोन बीजीएल लाँचर, दहा डेटोनेटर, २१ सुराका सेल, होंडा कंपनीचा एक इलेक्ट्रिक जनरेटर, २२ वायर बंडल तसेच मोठ्या प्रमाणात अन्य माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी ही कारवाई यशस्वी केली. या मोहिमेत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले.