गडचिरोली : माओवादविरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलिस दलातील पाच सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबई येथील पोलिस महासंचालक कार्यालयात आयोजित समारंभात पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली.
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगिराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनील बागल आणि राहुल देव्हडे यांचा समावेश आहे. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. पाचही सहायक पोलिस निरीक्षकांच्या खांद्यावर पोलिस निरीक्षकपदाची चिन्हे लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सदानंद दाते यांनी पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचे कौतुक केले. या पदोन्नतीमुळे दुर्गम भागातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून सेवेत गुणवत्ता, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेला अधिक बळ मिळत असल्याचे दाते म्हणाले.
याप्रसंगी एटीएसचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ.निखिल गुप्ता, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अपर पोलिस महासंचालक(सायबर) यशस्वी यादव, अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली पोलिसांना आजवर मिळालेली पदके
गडचिरोली पोलिस दलाला आजपर्यंत ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती पोलिस शौर्य पदके, ३३८ पोलिस शौर्य पदके, २० राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदके, १,५१० पोलिस महासंचालक पदके तसेच ४०४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती मिळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.