Gadchiroli Police Rojgar Melava
गडचिरोली : पोलिस दलाच्या प्रोजेक्ट उडाण अंतर्गत आज (दि. १६) गडचिरोली येथे आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे कृषी, वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले.
या मेळाव्यात १२७८ उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शिवाय माओवादविरोधी अभियानासाठी प्राप्त ३१ चारचाकी वाहनांचं लोकार्पणही जयस्वाल यांच्या हस्ते झालं. या मेळाव्यात देशातील ३८ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. जिल्हाभरातील ४ हजारांहून अधिक युवक-युवतींनी मेळाव्यात नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ४०० उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. त्यापैकी १२७८ उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली. निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख ८० हजार ते ३ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचं पॅकेज मिळालं आहे.
आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबतच कौशल्य आत्मसात करुन स्वत:मध्ये बदल घडवून आणावा, असं आवाहन आशिष जयस्वाल यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात खनिज आणि अन्य उद्योग येत असून, जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे, असंही जयस्वाल म्हणाले.
आ.डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, गोकुल राज जी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.