गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात ‘माओवादमुक्त दिवाळी’ उत्साहात साजरी करण्यात आली.  Pudhari News
गडचिरोली

Gadchiroli Maowad Mukt Diwali : 'दीप'पर्वात विकासाचे नवे पर्व! गडचिरोलीत पोलिसांकडून ७० ठिकाणी ‘माओवादमुक्त दिवाळी’ साजरी

जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि विकासाचे नवे पर्व सुरू करण्याच्या उद्देशाने राबविण्‍यात आला उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Maowad Mukt Diwali

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : माओवादमुक्त गडचिरोली जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि विकासाचे नवे पर्व सुरू करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात ‘माओवादमुक्त दिवाळी’ उत्साहात साजरी करण्यात आली.

जिल्ह्यात पोलिसांकडून ७० ठिकाणी ‘माओवादमुक्त दिवाळी’ साजरी

जिल्ह्यातील ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांच्या कार्यक्षेत्रात नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मिठाई, फटाके आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून नागरिकांच्या आनंदात पोलीस दल सहभागी झाले.

वरिष्‍ठ पालीस अधिकार्‍यांचा सहभाग

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी अतिदुर्गम बिनागुंडा येथे भेट देत नागरिक आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा यांनी गर्देवाडा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी पेंढरी, तर अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. यांनी जिमलगट्टा येथे नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद घेतला. अन्य दुर्गम भागांतही संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना मिठाई व फटाक्यांचे वाटप केले.

आत्मसमर्पित नक्षल्यांसोबत दिवाळी

गडचिरोलीतील नवजीवन वसाहत येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबतही दिवाळी साजरी करण्यात आली. हिंसक विचारसरणीचा त्याग करून शांतता आणि विकासाचा मार्ग स्वीकारलेल्या या सदस्यांना मिठाई व फटाक्यांचे वाटप करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेत आपुलकीचा संदेश दिला. समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगताना त्यांच्यात सुरक्षितता आणि विश्वासाची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

दुष्काळग्रस्तांनाही मदतीचा हात

दरम्यान, पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी, प्रोजेक्ट कृषी समृद्धी, सेवा मित्र मंडळ आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त व दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य आणि दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

पोलीस दलाकडून सामाजिक सलोखा, लोकसहभाग आणि विकासाला प्राधान्य

मे २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’मुळे जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून सामाजिक सलोखा, लोकसहभाग आणि विकासाला प्राधान्य दिले जात आहे. केवळ कायदा व सुव्यवस्था राखणेच नव्हे, तर दुर्गम भागातील नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबविण्‍यात येतील : पोलीस अधीक्षक एम. रमेश

‘माओवादमुक्त गडचिरोलीच्या वाटचालीत सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेसोबतच सामाजिक सलोखा, लोकसहभाग, विश्वास आणि विकास यांनाही महत्त्व आहे. पोलीस दल आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून शांततामय, सुरक्षित व विकसित गडचिरोली घडविण्यासाठी असे लोकाभिमुख उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील,’ असे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT