

Narcotics Seized Gadchiroli
गडचिरोली : अमली पदार्थांची अवैध वाहतूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांच्या टोळीला गडचिरोली पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि गट्टा (फुलबोडी) येथील पोलीस मदत केंद्रातील जवानांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल २४० किलो ५८० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या पदार्थांची अंदाजित किंमत १ कोटी २० लाख २९ हजार रुपये असून, तीन चारचाकी वाहने आणि आठ मोबाईलसह एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई ३१ ऑक्टोबर रोजी पेंढरी उपविभागातील (कॅम्प कारवाफा) गट्टा (फुलबोडी) पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्याकडे नोंदणी असलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी अडवून तपासणी केली. वाहनातील तिघांच्या संशयास्पद हालचाली आणि उडवाउडवीच्या उत्तरांमुळे पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत हे तिघे अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पायलटिंग करत असल्याचे समोर आले.
त्यांच्या माहितीवरून अंमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी पिकअप वाहनातून येणारे अन्य तिघे आणि अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी थांबलेले बीड जिल्ह्यातील दोघे अशा एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वांची कसून चौकशी केली असता १२ चुंगळ्यांमध्ये ठेवलेला २४० किलो ५८० ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आला.
या प्रकरणी आठही आरोपींविरुद्ध पेंढरी उपपोलीस ठाण्यात १ नोव्हेंबर रोजी एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून अंमली पदार्थांसह सात लाख रुपये किमतीचे एक चारचाकी वाहन, आठ लाखांचे पिकअप, दहा लाखांची स्कॉर्पिओ आणि ८१ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने आठही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे, पोलीस मदत केंद्र गट्टाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे आणि पोलीस पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे करीत आहेत.