Pearlkota River Flood
गडचिरोली : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या जुन्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद झाली असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. रात्रीपासून भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या नदीच्या नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच जुन्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले.
मागील चोवीस तासांत कुरखेडा तालुक्यातील कढोली मंडळात सर्वाधिक ११२.४, तर त्याखालोखाल सिरोंचा तालुक्यातील असरअली मंडळात ८८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा मंडळात ७५.४ मिलिमीटर पाऊस पडला.
आज आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगाव येथील नाल्याला पूर आल्याने मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसह अनेक वाहने अडकून पडली होती. जिमलगट्टा येथील रहिवासी मलय्या पंटीवार यांचा काल हेडरी येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिमलगट्टा येथे नेण्यात येत होता. परंतु नंदीगावच्या नाल्याला पूर आल्याने कुटुंबीयांना तात्कळत राहावे लागले.