गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित जेएसडब्लू स्टील प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या सुपीक जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भात पुनर्विचार करुन पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी आज विधानपरिषद सभागृहात उपस्थित केला.
आ.अभिजित वंजारी म्हणाले की, गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नव्या अधिसूचनेनुसार चामोर्शी तालुक्यातील १४ गावांमधील सुमारे ३ हजार ५०४ हेक्टर जमीन जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रस्तावित स्टील प्लांटसाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १४ लाख ४८ हजार हेक्टर असून, त्यापैकी जवळपास १० लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्र वनजमिनीचे आहे. शेतीसाठी उपलब्ध असलेली जमीन केवळ २ लाख १४ हजार हेक्टर इतकीच आहे. यापैकी सिंचनाखालील क्षेत्र अत्यंत मर्यादित असून फक्त ०.६७ लाख हेक्टर जमीनच सिंचनाखाली आहे.अशा परिस्थितीत औद्योगिक प्रकल्पांसाठी वारंवार सुपीक शेतजमीनच अधिग्रहित का केली जाते, असा सवाल स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असल्याचे आ.वंजारी यांनी नमूद केले. सध्या जमीन अधिग्रहणाची सातव्या टप्प्याची प्रक्रिया सुरू असून, यापूर्वीही अनेक टप्प्यांमध्ये अशाच प्रकारे जमीन अधिग्रहित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चामोर्शी तालुक्यातील संबंधित १४ गावांतील ग्रामस्थांनी या अधिग्रहणाविरोधात ठराव पारित केले आहेत. ग्रामस्थांचा विकासाला विरोध नसून, प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल,असे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते; मात्र अपेक्षित प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
प्रस्तावित जमीन अधिग्रहणाचा पुनर्विचार करून प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधण्याचा विचार करावा; जेणेकरून गावकऱ्यांची सुपीक शेती वाचेल, अशी मागणी आमदार अभिजित वंजारी यांनी सभागृहात केली. तसेच या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली.