गडचिरोली : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. परसराम धानूजी कुमरे(४८) असे शिक्षा झालेल्या दोषी इसमाचे नाव असून, तो धानोरा तालुक्यातील जपतलाई(कोवानटोला) येथील रहिवासी आहे.
ही घटना आहे ४ ऑक्टोबर २०२२ ची. या दिवशी परसराम कुमरे याने पत्नी मीराबाई(३७) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण केले. दुपारी १ वाजताच्या सुमारास भांडण विकोपाला गेले आणि परसरामने खलबत्त्याचा दांडा व चाकूने मीराबाईच्या डोक्यावर प्रहार केले. यात ती जागीच गतप्राण झाली. परसरामची बहीण आशा पोटावी हिने धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी परसरामवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर येरकड पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांनी परसराम कुमरे यास अटक केली. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
२६ ऑगस्टला या खटल्याचा निकाल लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी फिर्यादी, पंच व साक्षीदारांचे बयाण नोंदवून तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी परसराम कुमरे यास भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ६ महिन्यांच्या वाढीव कारावासाची शिक्षेचीही तरतूद न्यायालयाने केली.
Meta Keywords:
, , ,,
सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शंकर चौधरी, भैयाजी जेंगठे, हवालदार जिजा कुसनाके, मिनाक्षी पोरेड्डीवार, पोलिस शिपाई जीवन कुमरे, छाया शेट्टीवार यांनी जबाबदारी सांभाळली.