

Gadchiroli six year old boy drowning
गडचिरोली : ऐन पोळ्याचा सण तोंडावर असताना सहा वर्षीय बालकासह अन्य एका व्यक्तीचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. रिशान प्रकाश पुंगाटी (वय ६, रा. कोयार व टोका डोलू मज्जी (वय ३६, रा. भटपार, ता. भामरागड) अशी मृतांची नावे आहेत.
रिशान पुंगाटी हा कोयार गावापासून १० किलोमीटर अंतरावरील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिकत होता. पोळा सण असल्याने वडिलांनी त्याला गुरुवारी (दि.२१) गावी आणले होते. घरी आल्यानंतर काही वेळाने तो गावानजीक असलेल्या नाल्याकडे खेळायला गेला. परंतु बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही. आज महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा शोध मोहीम राबवली असता नाल्यात रिशानचा मृतदेह आढळून आला. नाल्यावर पूल नसल्याने तुंडुंब भरलेल्या नाल्यातून रिशानचा मृतदेह बाहेर काढावा लागल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
दुसऱ्या एका घटनेत भटपार येथील टोका डोलू मज्जी या व्यक्तीचाही नाल्यात बुडून मृत्यू झाला. मूळचा छत्तीसगड राज्यातील बैरमगड तालुक्यातील हालेवाडा येथील रहिवासी असलेला टोका मज्जी हा मागील दहा वर्षांपासून विठ्ठल वत्ते मडावी यांच्याकडे घरजावई म्हणून राहत होता. गुरुवारी २१ ऑगस्टला संध्याकाळी तो घरच्या कुणालाही न सांगता शेताजवळच्या नाल्यावर आंघोळीसाठी गेला होता. परंतु मिरगीचा आजार असल्याने नाल्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी कुटुंबीयांना त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. महसूलसेवक सुरेश मज्जी यांच्या सहकार्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे.
चालू आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्याने भामरागड तालुक्यातील अनेक गावांना पुराने वेढले होते. अनेक नद्या आणि नाल्यांवर पूल नसल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अशातच पुरामुळे मागील पाच दिवसांत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. सोमवारी (ता.१८) भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील लालचंद कपिलसाय लकडा ( वय १९) हा तरुण खंडी नाला ओलांडताना पुरात वाहून गेला. त्याच दिवशी जोनावाही येथील रहिवासी असलेले असंतू सोमा तलांडे या मुख्याध्यापकाचाही शाळेतून गावाकडे जाताना नाल्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर आता एक सहा वर्षीय बालक आणि एका व्यक्तीला प्राण गमवावा लागल्याने भामरागड तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.