गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला  (Pudhari Photo)
गडचिरोली

Gadchiroli Politics | गडचिरोलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार: माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांचा शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

'आम्हीच मोठे, बाकी सगळे कनिष्ठ' हा भाजपचा विचार: हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

पुढारी वृत्तसेवा

NCP Sharad Pawar Group Congress Joining

गडचिरोली : भाजप विचारधारेच्या लोकांनी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांना प्रचंड त्रास दिला. आताही आम्हीच मोठे, बाकी सगळे कनिष्ठ हाच भाजपचा विचार असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे केली.

अनेक वर्षे गडचिरोलीचे नगराध्यक्ष राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) ज्येष्ठ नेते सुरेश पोरेड्डीवार, माजी प्राचार्य कविता पोरेड्डीवार, माजी सभापती विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षलता येलमुले, एड.लालसू नोगोटी यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभेचे काँग्रेसचे गटनेते आ.विजय वडेट्टीवार, आ.रामदास मसराम, आ.अभिजित वंजारी, काँग्रेसचे निरीक्षक संदेश सिंगलकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र दरेकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, माजी नगराध्यक्ष अॅड.राम मेश्राम यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, काँग्रेसने गोरगरिबांना अन्न, निवारा आणि सुरक्षा दिली. राज्यघटनेत पाचव्या अनुसूचीद्वारे आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण केले. परंतु, आता या जमिनी खाण व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्याचा घाट भाजपने घातला आहे. सत्तेच्या काळात भाजपने बक्कळ पैसा जमवला. त्याचा वापर करुन ते सर्वकाही करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांना श्रीमंतांविषयी आपुलकी आहे. मात्र, गरिबांविषयी कळवळा नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली.

यावेळी माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, संध्या उईके, कविता बोबाटे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मनिषा खेवले, रामचंद्र वाढई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी आ.विजय वडेट्टीवार यांनीही भाजप, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. यावेळी आ.रामदास मसराम, आ.अभिजित वंजारी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सुरेश पोरेड्डीवार, विजय गोरडवार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष सतीश विधाते यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT