गडचिरोली : भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथून ताब्यात घेतलेल्या दोन नक्षलींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राधिका बुचन्ना मडावी व पोडिया आयतू कुंजाम अशी त्यांची नावे आहेत. राधिका ही छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील नेंडरा, तर पोडिया हा मरतूर येथील रहिवासी आहे. दोघेही प्लाटून क्रमांक ३२ चे सदस्य आहेत. २० मे रोजी पोलिसांनी बिनागुंडा येथून पाच नक्षलींना ताब्यात घेतले होते. त्यातील उंगी मंगरु होयाम उर्फ सुमली, पल्लवी केसा मिडियम उर्फ बंडी आणि देवे कोसा पोडियाम उर्फ सविता या तिघांना अटक केली होती, तर राधिका व पोडिया यांनी अल्पवयीन असल्याचे सांगितल्याने त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यात ते अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश व सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.