Gadchiroli Naxal announcement Ceasefire
गडचिरोली : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याच्यासह अनेक नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातल्यानंतर बॅकफूटवर आलेल्या नक्षल्यांनी अल्पकाळासाठी शस्त्र त्यागाची घोषणा केली. त्यांनी केंद्र सरकारला शांततेसाठी चर्चेचे आवाहन केले आहे.
माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रवक्ता भूपती उर्फ अभय याने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. मार्च २०२५ पासून आम्ही केंद्र सरकारला शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेचे आवाहन करीत आहोत. १० मे रोजी एक पत्रक जारी करुन शस्त्र त्याग करुन युद्धबंदीसाठी माओवादी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली होती. परंतु केंद्र सरकारने प्रतिसाद न देता जानेवारी २०२४ पासून घेराव करुन माओवाद्यांना ठार करण्याची आपली योजना सुरुच ठेवली. परिणामी २१ मे रोजी माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव बसवा राजू यांच्यासह अनेक केंद्रीय समिती सदस्य व दलम सदस्य असे एकूण २७ नक्षली ठार झाले, असे 'अभय'ने म्हटले आहे.
जग आणि भारतात बदलत चाललेली परिस्थिती तसेच पंतप्रधान, गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी वारंवार मुख्य प्रवाहात येण्यासाठी करीत असलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही शस्त्र त्याग करुन महिनाभरासाठी युद्धबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या एक महिन्याच्या कालावधीत माओवादी पक्ष लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी इतर राजकीय पक्ष आणि संघटनांना सहकार्य करेल, असे स्पष्ट करुन अभय याने केंद्रीय गृहमंत्री किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. शिवाय माओवादी विचारांशी जुळलेले विचारवंत, नेते आणि कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या नेत्यांशीही आम्ही विचारविनिमय करुन त्यांचे मत जाणून घेऊ, असे अभयने म्हटले आहे.
छत्तीसडमध्ये ज्याची प्रचंड दहशत आहे त्या पीपल्स लिबरेशन गुर्रिल्ला आर्मीच्या बटालियन एकचा कमांडर माडवी हिडमा यास पदोन्नत करुन दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सचिव बनविण्यात आले आहे. शिवाय बसवा राजू ठार झाल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिट ब्युरो सदस्य थिप्परी तिरुपती उर्फ देवजी याची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती केल्याचीही चर्चा आहे. हे दोन्ही नेते आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, प्रचंड संख्येने वाढलेले पोलिस बळ आणि चकमकीत अनेक महत्वाचे नक्षल नेते ठार झाल्याने यापुढे पोलिसांशी दोन हात करणे शक्य नाही, त्यामुळे शांतीवार्ता करुन त्या युद्धबंदीच्या काळात जनाधार निर्माण करण्यावर नक्षल्यांकडून भर दिला जाऊ शकतो, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.