Naxal leader Devji surrender
गडचिरोली : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचि थिप्परी तिरुपती उर्फ देवजी आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम या दोघांसह नक्षल्यांच्या अन्य दोन बड्या नेत्यांनी मंगळवारी (दि.२४) तेलंगणाच्या पोलिस महासंचालकांपुढे अधिकृतरित्या आत्मसमर्पण केले.
देवजी आणि संग्राम या केंद्रीय समितीच्या नेत्यांसह अन्य नक्षल्यांनी तेलंगणा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी' ने २३ फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित केले होते. त्यानंतर आज तेलंगणाचे पोलिस महासंचालक शिवाधर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन देवजीसह चार बड्या नक्षल नेत्यांनी आत्मसमर्पण केल्याचे माध्यमांना सांगितले.
माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव,पॉलिट ब्युरो मेंबर व केंद्रीय समिती सदस्य थिप्परी तिरुपती उर्फ देवजी(६२), केंद्रीय समिती सदस्य होता. मल्लाराजी रेड्डी(७६), तेलंगणा राज्य समिती सचिव बडे चोक्का राव उर्फ दामोदर(४७) आणि तेलंगणा राज्य समिती सदस्य नुने नरसिम्हा रेड्डी उर्फ गंगन्ना(६२) यांचा आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या चौघांच्या आत्मसमर्पणामुळे देशातील नक्षल चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. आता माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा माजी महासचिव मुप्पाला लक्ष्मण राव व पॉलिट ब्युरो मेंबर मिशिर बेसरा या दोन नेत्यांच्या आत्मसमर्पणाची देशाला प्रतीक्षा आहे.
मागील तीन वर्षांत तेलंगणामध्ये ५९१ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात ४ केंद्रीय समिती सदस्य, १६ राज्य समिती सदस्य आणि २६ विभागीय समिती सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस महासंचालक बी.शिवाधर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली .
वाढतं वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे नक्षल चळवळीतून बाहेर पडत असल्याचं देवजीनं सांगितलं. शस्त्र त्यागून चळवळ सोडली असली तरी लोकांच्या हितासाठी क्रांतिकारी विचाराने काम करु, असंही देवजी म्हणाला.