

गडचिरोली : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजी आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम या दोघांसह १५ हून अधिक सशस्तर नक्षल्यांनी आज तेलंगणा राज्यातील आसिफाबाद पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचं वृत्त आहे.
एप्रिल-मे २०२५ मध्ये छत्तीसगडच्या १० हजारांहून अधिक पोलिसांनी करेगुट्टा पहाडावर नक्षल्यांना घेरले होते. या अभियानादरम्यान २१ मे रोजी नक्षल्यांचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू ठार झाला. त्यानंतर तिरुपती थिप्परी उर्फ देवजी यास राष्ट्रीय महासचिव बनविण्यात आले होते. बसवा राजूच्या मृत्यूनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं.
१८ नोव्हेंबर २०२५ ला नक्षल्यांच्या मिलिटरी कमांडचा प्रमुख माडवी हिडमा आणि त्याच्या पत्नीला छत्तीसगड पोलिसांनी कंठस्नान घातलं. त्यानंतर सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजी हा आत्मसमर्पण करणार अशा बातम्या येत होत्या. अखेर आज देवजीनं आत्मसमर्पण केलं.
तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील कोरुटला गावातील डॉ.आंबेडकर नगरातील रहिवासी असलेला ६४ वर्षीय थिप्परी तिरुपती हा 'माडिगा' या दलित समुदायातील आहे. १९८० मध्ये बारावीत असताना तो करीमनगर येथील विद्यार्थ्यांच्या क्रांतिकारी चळवळीशी जुळला. त्यानंतर १९८३ मध्ये तेव्हाच्या पीपल्स वॉर ग्रूपमध्ये प्रवेश केला. त्याने सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यात दलम सदस्य व कमांडर म्हणून काम केले. त्यानंतर तो विभागीय समिती सदस्य झाला. पुढे त्याला दंडकारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
२००१ मध्ये त्याची केंद्रीय समितीचा सदस्य आणि सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नक्षल चळवळीची माहिती देणारे 'अवामी जंग' हे नियतकानिकसुद्धा तो प्रकाशित करीत होता. गोव्यापासून केरळपर्यंत गुर्रिल्ला झोन स्थापन करण्यात देवजीची भूमिका महत्वाची राहिली आहे. विशेषत: छत्तीसगड राज्यात झालेल्या मोठ्या हल्ल्यांचा मास्टर माईंड देवजी होता. २००७ मध्ये रानीबोदली येथील हल्ल्यात ५५ आणि एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या भूसुरुंगस्फोटात ७६ जवान शहीद झाले होते. दोन्ही हल्ल्यांचा सूत्रधार देवजीच होता.
देवजीसह आत्मसमर्पण करणारा दुसरा माओवादी नेता मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम उर्फ मुरली हा केंद्रीय समिती सदस्य होता. १९७५ पासून माओवादी चळवळीशी जुळला होता. तेलंगणा राज्यातील पेदापल्ली जिल्ह्यातील शतरंजपल्ली खेड्यात मल्लाराजीचा जन्म झाला. मल्लाराजीची पहिली पत्नी रथनम्मा उर्फ राजक्का उर्फ निर्मला १९९८ मध्ये एका चकमकीत ठार झाली. त्यानंतर त्याने छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बिच्चा उर्फ सगुणा हिच्याशी विवाह केला. २०२३ पर्यंत मल्लाराजी रेड्डी हा ओरिसा स्टेट कमिटाचा सचिव होता. परंतु त्यानंतर त्याला बस्तर भागात बोलावण्यात आलं होतं. २०२३ मध्ये मल्लाराजी रेड्डीचं आजारामुळे निधन झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. परंतु तो जिवंत होता. आज त्याने आत्मसमर्पण केलं. त्यांनी अनेक एके-४७ व इंसास रायफली पोलिसांकडे सुपूर्द केल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून सशस्त्र नक्षलवादी चळवळीचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प वारंवार बोलून दाखविला आहे. त्याअनुषंगाने जेथे बसवा राजू ठार झाला, त्या छत्तीसगडमधील करेगुट्टा पहाडावर पुन्हा पोलिसांनी मोठे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. अशातच सर्वोच्च नेता देवजी आणि मल्लाराजी रेड्डी यांचं आत्मसमर्पण हे सशस्तर नक्षलमुक्त भारत निर्मितीचं महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.