गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील कवंडे येथे घातपात घडवून आणण्याच्या हेतूने रेकी करत असताना एका जहाल नक्षल्यास पोलिसांनी अटक केली. अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (२८,रा. कवंडे ता. भामरागड) असे त्याचे नाव असून तो कोरची दलमचा उपकमांडर होता. कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे १ मे २०१९ रोजी भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या स्फोटात त्याचा सक्रिय सहभाग होता.
२७ जून रोजी कवंडे जंगल परिसरात विशेष अभियान पथकाची दोन पथके, कवंडे येथील पोलिस पथक आणि राज्य राखीव दलाच्या कंपनी ३७ बटालियनचे एक पथक नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती फिरताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेतले होते. पोलिस मुख्यालयात आणून त्याची चौकशी केली असता तो अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो असल्याचे निष्पन्न झाले. सध्या तो कोरची दलममध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होता.
कवंडे जंगल परिसरात घातपात करण्याकामी रेकी करण्यासाठी आल्याची कबुली त्याने दिली. त्याच्यावर पाच गुन्हे नोंद असून तपासकामी त्यास कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले. २८ रोजी त्यास कुरखेडाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, श्री. सत्य साई कार्तिक, उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व भामरागडचे उपअधीक्षक अमर मोहिते, कुरखेडाचे उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कवंडेचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक मंदार शिंदे, विशेष अभियान पथक तसेच सीआरपीएफ ३७ बटा. सी-कंपनीचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली.
२ मे २०२९ रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भुसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामध्ये अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो याचा सक्रिय सहभाग होता. यासोबतच खोब्रामेंढा जंगलात २९ मार्च २०२१ रोजी झालेल्या चकमकीतही तो सामील होता. त्याच्यावर शासनाचे सहा लाखांचे बक्षीस होते.