Anti Corruption Bureau Gadchiroli News
गडचिरोली : शेतजमिनीच्या पोटहिस्स्याची मोजणी करणे आणि सातबारा वेगळा करुन चालान काढून देण्यासाठी एका व्यक्तीकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुरखेडा येथील भूमी अभिलेख विभागाचा मुख्यालय सहायक रवींद्र सदाशिव दिनकोंडावार (वय ४२) यास रंगेहाथ पकडले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने त्याच्या शेतजमिनीच्या पोटहिस्स्याची मोजणी करुन, सातबारा वेगळा करुन चालान भ्रण्यासाठी कुरखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे रीतसर अर्ज केला. परंतु या कामासाठी मुख्यालय सहायक रवींद्र दिनकोंडावार याने १ लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने संबंधित व्यक्तीने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी ५ ऑगस्टला पडताळणी केली असता रवींद्र दिनकोंडावार याने १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. पुढे तडजोडीअंती तो ७० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रवींद्र दिनकोंडावार यास ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्याच्यावर कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सागर कवडे, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजारकर, स्वप्नील बांबोळे, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे, चापले यांनी ही कारवाई केली.