Gadchiroli Kurkheda Gambling Police Raid
गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करीत कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून सुमारे ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी २२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ८ जण फरार झाले आहेत.
कुरखेडा येथील एजाज शेख उर्फ कात्या हा खेडेगाव परिसरात जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंह दुल्हत आणि कुरखेड्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आज मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यावेळी काही नागरिक पत्त्यांवर पैशाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच काही नागरिक पळून गेले.
मात्र, मुख्य आरोपी एजाज रफिक शेख उर्फ कात्या (४१) रा.कुरखेडा याच्यासह २२ जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. मात्र, ८ जण फरार होण्यात यशस्वी झाले. शिवाय आरोपींची अंगझडती घेतली असता तेथे २ लाख ७५ हजार २०० रुपये एवढी रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी ही रक्कम, पत्ते, २३ मोबाईल, १३ चारचाकी वाहने, ६ मोटारसायकली असा एकूण ७१ लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, गोकुल राज जी, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, कुरखेड्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंह दुल्हत, हवालदार सुधाकर दंडिकवार, राजू पंचफुलीवार, श्रीकांत बोईना, निशिकांत अलोणे, भास्कर आघाव, राजकुमार खोब्रागडे, दीपक लोणारे, कुरखेडा पोलिस ठाण्याचे हवालदार शेखलाल मडावी, अमोल आलाम, संदेश भैसारे, नंदकिशोर मेश्राम, नरसिंह कोरे यांनी ही कारवाई केली.
खेडेगाव-गेवर्धा परिसरात मागील अनेक दिवसांपासून हा हाय प्रोफाईल जुगार अड्डा सुरु होता. महागड्या गाड्या घेऊन रात्री-बेरात्री अनेक शौकीन जुगार खेळण्यासाठी तेथे जात होते. मात्र, पोलिसांनी अखेर धाड टाकून खेळ बंद केला. आतापर्यंत या जुगार अड्ड्याला कुणाचा आशीर्वाद होता, असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत.