Koparshi Forest Gadchiroli
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत सहा अग्निशस्त्रांसह १० बीजीएल सेल, २१ जिवंत काडतुसे, सात डेटोनेटर, १५० मीटर केबल वायर तसेच वॉकीटॉकी संच असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला.
माओवाद्यांनी जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ६ ऑक्टोबर रोजी विशेष अभियान पथकाच्या प्राणहिता येथील पाच तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या दोन तुकड्यांनी कोपर्शी जंगलात शोधमोहीम राबविली.
या वेळी परिसराची कसून तपासणी केली असता एक .३०३ रायफल, दोन सिंगल शॉट रायफल, दोन गावठी पिस्तूल आणि एक बीजीएल लाँचर अशी सहा अग्निशस्त्रे आढळून आली. याशिवाय १० बीजीएल सेल, २१ जिवंत काडतुसे, सात डेटोनेटर, १५० मीटर केबल वायर, दोन मॅगझिन, दोन कुकर, तीन वॉकीटॉकी, तीन चार्जर आणि दोन वॉकीटॉकी बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. इतर माओवादी साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी केली. कारवाईतील जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले.